फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

घड्याळ

गडबड घाई जगांत चाले,
आळस डुलक्या देतो पण;
गंभीरपणें घड्याळ बोले –
‘आला क्षण- गेल क्षण !’            १

घड्याळास या नाहीं घाई,
विसावाहि तो नाहीं पण;
त्याचें म्हणणें ध्यानीं घेई –
‘आला क्षण – गेला क्षण !’         २

कर्तव्या जे तत्पर त्यांचे
दृढ नियमित व्हावयास मन,
घड्याळ बोले अपुल्या वाचे –
‘आला क्षण-गेला क्षण !!            ३

कर्तव्याला विमुख आळशी
त्यांच्या हृदयीं हाणित घण,
काळ-ऐक ! – गातो अपुल्याशीं
‘आला क्षण – गेला क्षण !’         ४

लवाजम्याचे हत्ती झुलती
लक्ष्य त्यांकडे देतो कोण,
मित रव जर हे सावध करिती –
‘आला क्षण – गेला क्षण !’        ५

आनन्दी आनन्द उडाला,
नवरीला वर योग्य मिळाला !
थाट बहुत मंडपांत चाले –
भोजन, वादन, नर्तन, गान !
काळ हळू ओटीवर बोले –
‘आला क्षण-गेला क्षण !”          ६

‘कौतुक भारी वाटे लोकां
दाखविण्या पाहण्या दिमाखा,
तेणें फुकटचि जिणें होतसे !
झटा ! करा तर सत्कृतिला !’
सुचवित ऐसें, काळ वदतसे –
‘क्षण आला, क्षण गेला !’         ७

वार्द्धक्य जर सौख्यांत जावया
व्हावें, पश्चाताप नुरुनियां,
तर तरुणा रे ! मला वाटतें,
ध्यानीं संतत आपुल्या आण
घड्याळ जें हें अविरत वदर्ते –
‘आला क्षण-गेला क्षण!’           ८

 

मुंबई, ३ डिसेंबर १८९५
विद्यार्थीमित्र, वर्ष २ अंक ३
डिसेंबर, १८९५, पृ. ४१-४३

केशवसुतांचा जीवनपट

फलक