फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

दिवस आणि रात्र

(जाति – अचलगती बालानंद)

दिवस बोलतो “उठा झणीं !”
रात्र “विसांवा घ्या !” म्हणते,
या दों वचनी दिनरजनी
बहुत सुचविती, मज गमतें.       १

दिवस सांगतो “काम करा,”
रात्र – “विचारा करा मनीं,”
दिवस बोलतो “मरा मरा;”
रात्र – “मजमुळें जा तरुनी,”       २

दिवस वदतसे “पहा प्रकाश;”
आंत शिरतसे परि अंधार !
रात्र बोलते “पहा तमास;”
परि आंत पडे प्रकाश फार !        ३

दिवस म्हणे “जा घरांतुनी.”
रात्र वदे “या सर्व घरास.”
स्पर्धा लावी दिवस जनी;
रात्र शिकविते प्रीति तयांस !       ४

नक्षत्रे जगतीवरलीं
दिवस फुलवितो, असे खरें;
पुष्पें आकाशांमधली
रात्र खुलविते, पहा बरें.            ५

एकच तारा दिन दावी,
असंख्य भास्कर परी निशा;
दिवस उघडितो ही ऊर्वी,
रजनी अनंत आकाशा !            ६

दिवस जनांला देव दिसे,
परि गद्यच त्याच्या वदनीं;
रात्र राक्षसी भासतसे,
परि गाते सुंदर गाणीं !             ७

“ही भूमी हा नरक !” असें
वदे अदय दिन वारंवार;
“ही धऱणी हा स्वर्ग असे !”
गाते रजनी, जी प्रिय फार !      ८


करमणूक, १४ सप्टेंबर १८९५, पृ. ३६६
काव्यरत्नावली, वर्ष १३, अंक ४
एप्रिल १९०१, पृ. ६०-६१

केशवसुतांचा जीवनपट

फलक