फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

दोन बाजी

(जाति-हरिभगिनी)

त्या शूरानें भगवा झेंडा हिदुस्थानीं नाचविला,
निजराष्ट्राचें वैभव नेलें एकसारखें बढतीला;
जिकडे तिकडे समशेरीची कीर्ति आपुल्या गाजविली,
खुप शर्तीनें कदर आपली गनीमांस त्या लावियली,
आणि तुवां रे ? – त्वां नीचानें पाठ आपुली दावुनियां
रणांतुनी पौबारा केला, शेपूट भ्याडा वळवुनियां !            १

गुणी जनांची पारख करुनी त्या धीरानें गौरविले,
उत्साहाच्या वातें अपुल्या तेज तयांचे चेतविलें;
प्रतीपदीपज्योति पोषिली सुजनस्नेहा वाढवुनी,
गनीममशकें कितीक गेलीं तिच्यामधें खाक् होवोनी !
आणिक तूं रे ? – नाचलासि तूं नग्रच संगें अधमांचे,
धूळ खात गेलास-लाविले सर्वत्र दिवे शेणाचे !               २

भटांस जे रणधुरंधुर तयां पाचरुनि त्या सिंहानें
माराया कीं मरावया अरिवरि नेले आवेशानें;
‘हरहर!’ शब्दा परिसुनि वळली कितिकांची घाबरगुंडी
‘अला मराठा !’ म्हणत दडाल्या सैरावैरा किति लंडी !
तूंहि भटांला पाचरियलें; काय त्यांसवें पण केलें ?-
यथेच्छ लाडू मात्र झोडिले – नांव हायरे बुडवीलें !           ३

घोड्यावरीच हुरडा चोळित शत्रुशासना धांवोनी
तो गेला.- तूं बिछान्यावरी राहिलास रे लोळोनी !
वीर भले खंबीर आणखी मुत्सद्दी ते सदबुद्धी
त्यांच्या साह्यें निजसत्तेची त्यानें केली रे वृद्धि.
पण तूं रे ?- तूं नगरभवान्या नाच्येपो-ये घेवोनी
दौलतजादा केला – धिग् धिग भटवंशी रे जन्मोनी !        ४

या भटवंशी महाप्रतापी ख्यात जाहले असूनियां
तुळशीमध्ये भांग निघाली अभद्र ऐशी कोठुनियां !
निजनामाचा ‘गाजी’ ऐसा अर्थ उरवुनी तो गेला,
तर हळहळली आर्यमाउली ऐकुनि त्याच्या निधनाला !
मरणा आर्धिच मरुन आणुनि काळोखी निजराष्ट्राला,
तूं गेलासी करुन ‘पाजी’ अहह ! पितामह नामाला !         ५

मुंबई, १६ फेब्रुवारी १८९५
करमणूक, २३ फेब्रुवारी १८९५, पृ. १३२

केशवसुतांचा जीवनपट

फलक