फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

विद्यार्थ्याप्रत

(जाति – महती)

महत्त्व भारी आहे या पृथ्वीचें,
त्याहुनि अतिशय या सगळ्या विश्वाचें
परि तुजमध्ये महतीचें जें बीज
त्याहुनि कांही मोठी नाहीं चीज;-
ठसव मनीं हें साचें;
बाबा ! हें वच बहु मोलाचें !                १

अग्नि असे हा तेजस्वी रे फार,
त्याहुनि भारी सूर्य नभींचा थोर;
परी किरण जो तुजमध्ये सत्याचा
प्रकाश सर्वोत्तम तो आहे त्याचा;-
घोक सदा हें वाचे,
बाबा ! हें वच बहु मोलाचें !               २

पृथ्वीमध्यें रत्‍नें बहु, आहेत;
आकाशीं तर असंख्य दिसताहेत;
परि एक रत्‍न तुजमध्यें जें सच्छील
कोणाला नच सर त्याची येईल;-
स्मरण असूं दे याचें
बाबा ! हें वच बहु मोलाचें                ३

स्नायुमध्यें पुष्कळ आहे शक्ति,
नृपवेत्रीं तर फारच आहे म्हणती;
परि एक एक जो नवा शब्द तूं शिकसी
शक्ति तयाची उलथिल सर्व जगासी !-
पठन तर करीं त्याचें,
बाबा ! जग हें बदलायचें                 ४

- विद्यार्थिमित्र, वर्ष १, अंक ६, फेब्रुवारी १८९५, पृ. ८४-८५
मासिक मनोरंजन, वर्ष २, अंक २, ऑगस्ट १८९६ पृ. ४०
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १०४

केशवसुतांचा जीवनपट

फलक