फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

प्रीति आणि तूं

वृत्त-शार्दूलविक्रीडित

रानोमाळ कुठें तरी तुजविणें मी हिंडतां वेंचिलीं,
कांही रम्य फुलें, परी झडकरी निर्माल्य माझ्या करीं
झालीं मी विरहाग्नितप्त असल्यायोगें; गडे त्यापरी
ओसाडींत दिशांचिया भटकतां गाणीं मला लाभलीं,
डोक्याच्या भ्रमणामुळें बिघडुनी विक्षिप्त तीं जाहलीं :
ही गाणीं कुसुमेंहि तीं परि दिलीं मीं टाकुनी का दूरी ?-
नाही ! – ठेवियलीं जपूनि असती अद्यापि ते सुन्दरी !
तीं मीं कां?- हृदयीं विचारुनि पहा – कां बुद्धि ही सूचली ?
कोणीं तीं कचर्‍यावजा समजुनी टाकावया लागला,
त्यालागूनि निषेधिलें, न कथिला हेतू तरी मीं तया;
तो हा कीं जर भेटलीस तर गे दावीन तीं मी तुला,
तेणें व्यक्त तुला न राहिल सखे हें एवढें व्हावया ;-
दुर्दैवें तुज सोडुनी जरि दुरी लागे फिरावें मला,
प्रीती आणिक तूं – शिवाय न सुचे कांही मना माझिया !

मुंबई, २७ नोव्हेंबर १८९३
करमणूक, ६ जानेवारी १८९४, पृ. ७६

केशवसुतांचा जीवनपट

फलक