फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

थकलेल्या भटकणाराचें गाणें

( जाति –हरिभगिनी)

किती रहावें तुजविण आता ! धीर न मजला क्षण धरवे !
गेलें गेलें वय हें वाया ! मरणहि तें वाटे बरवें !
काय करावें मज न सुचे,
मुळीं न मजला किमपि रुचे,
हृदयीं सगळें धैर्य खचे;
भणभण वणवण करित अधिक मज आढ्यीहि जगीं नच फिरवे !
किती रहावें तुजविण आतां ! धीर न मजला क्षण धऱवे !       १

कितिक योजिले यत्‍न याया तुजशीं मी उत्सुकतेनें !
व्यर्थ जाहले अवघे ! दुर्धर कसें न व्हावें मग जगणें ?
पुष्पांनो ! तर दूर सरा !
कण्टक हो ! मार्गी पसरा !
प्रकाश नलगे – तिमिर बरा !
सर्व चांगलें व्हावें होतें तुजसाठीं – पण लभ्य नव्हे !
किती रहावें तुजविण आतां ! धीर न मजला क्षण धरवे !       २

शूळ कपाळीं, कंडन हृदयी, कम्प शरीरीं भरलासे,
सलिल लोचनीं, शीण अवयवीं, हाय ! निराशा मनीं वसे;
तरि, माझी ती भेटेल का ?
पांग मनींचा फिटेल का ?
आलिंगू ती झटेल का ?
क्षमा करिल का मला चुक्यांची ? पुस्तों मी माझे बरवे !
किती रहावें तुजविण आतां ! धीर न मजला क्षण धऱवे !       ३

मुंबई, २८ सप्टेंबर १८९३
करमणूक, ११ नोव्हेंबर १८९३, पृ. १३ मासिक

केशवसुतांचा जीवनपट

फलक