फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

तुतांरी

(जाति-पादाकुलक)

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन जी मी स्वप्राणानें,
भेटुनि टाकिन सगळीं गगनें
दीर्घ जिच्या त्या किंकाळीनें,
अशी तुतारी द्या मजलागुनि.          १

अवकाशाच्या ओसाडींतिल
पडसाद मुके जे आजवरी,
होतिल ते वाचाल सत्वरी
फुंक मारिता जीला जबरी,
कोण तुतारी ती मज देईल?          २

सारंगी ती, सतार सुन्दर
वीणा, बीनहि, मृदंग, बाजा
सूरहि, सनई, अलगुज, -माझ्या
कसचीं हीं हो पडतिल काजा?
एक तुतारी द्या तर स्तवर.           ३

रुढी जुलूम यांचीं भेसुर
सन्तानें राक्षसी तुम्हाला
फाडुनि खाती, ही हतवेला
जल्शाची का ? – पुसा मनाला;
तुतारिनें ह्य सावध व्हा तर !         ४

अवडम्बरलीं ढगें कितीतरि,
रविकिरणांचा चूर होतसे,
मोहर सगळा गळुनि जातसे,
कीडा पिकांवरि सर्वत्रे दिसे !
गाफीलगिरी तरिही जगावरि         ५

चमत्कार ! तें पुराण तेथुनि
सुन्दर, सोज्वळ, गोडें, मोठें,
अलिकडलें तें सगळें खोटें
म्हणती, धरुनी ढेरीं पोटें,
धिक्कार अशा मूर्खालागुनि !        ६

जुन्या नभीं या ताजे तारक,
जुन्या भूमिवर नवी टवटवी,
जुना समुद्रहि नवरत्‍ने वी;
जुन्यांतून जी निष्पत्ति नवी
काय नव्हे ती श्रेयस्कारक ?         ७

जुनें जाउं द्या मरणालागुनि,
जाळुनि किंवा पुरुनि टाका,
सडत न एक्या ठायीं ठाका,
सावध ! ऐका पुढल्या हाका !
खांद्यास चला खांदा भिडवुनि !      ८

प्राप्तकाल हा विशाल भूधऱ,
सुन्दर लेणीं तयांत खोदा,
नांवे अपुलीं त्यांवर नोंदा;
बसुनी कां वाढवितां मेदा ?
विक्रम कांही करा, चला तर !       ९

अटक कशाची बसलां घालुनि ?
पूर्वज वदले त्यां गमलें तें –
ऐका खुशाल सादर चित्तें,-
परन्तु सरका विशंक पुढते
निरोप त्यांचा ध्यानीं घेउनि !     १०

निसर्ग निर्घुण, त्याला मुर्वत
नाहीं अगदीं पहा कशाची!
कालासह जी क्रीडा त्याची,
ती सकलांला समान याची-
चुरुनी टाकी प्रचंड पर्वत !            ११

त्याशीं भिडुनी, झटुनी, झगडत
उठवा अपुले उंच मनोरे !
पुराण पडक्या सदनीं कारे
भ्याड बसुनयां रडता पोरें ?
पुरुषार्थ नव्हे पडणें रखडत !        १२

संघशक्तिच्या भुईंत खंदक
रुंद पडुनि शें तुकडे झाले,
स्वार्थापेक्ष जीवीं अपुलें
पाहिजेत ते सत्वर भरलें;
घ्या त्यांत उड्या तर बेलाशक !    १३

धार धरिलिया प्यार जिवावर,
रडतिल, रडोत, रांडा पोरें;
गतशतकांची  पापें घोरे
क्षालायाला तुमचीं रुधिरें
पाहिजेत ! स्त्रैँण न व्हा तर !       १४

जाऊं बघतें नांव लयाप्रत
तशांत बनलां मऊ मेंढरें,
अहह ! घेरिलें आहे तिमिरें !
परन्तु होऊं नका बावरे –
धीराला दे प्रसंग हिंमत !            १५

धर्माचें माजवूनि डम्बर,
नीतीला आणिती अडथळे;
विसरुनियां हें जातात खुळे :-
नीतीचें पद जेथें न ढळे
धर्म होतसे तेथेंच स्थिर            १६

हल्ला करण्या तर दंभावर – तर बंडावर,
शूरांनो ! या त्वरा करा रे !
समतेचा ध्वज उंचा धरा रे !
नीतीची द्वाही पसरा रे
तुतारिच्या या सुराबरोबर!         १७

नियमन मनुजासाठीं, मानव,
तसे नियमनासाठीं जाणा,
प्रगतिंस जर तें हाणी टोँणा,
झुगारुनि तें देउनि, बाणा
मिरवा निज ओजाचा अभिनव!   १८

घातक भलत्या प्रतिबन्धांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे !
उन्नतिचा ध्वज उंच धरा रे !
वीरांनो ! तर पुढें सरा रे
आवेशानें गर्जत “हरहर”!          १९

पूर्वीपासुनि अजुनि सुरासूर
तुंबळ संग्रामाला करिती;
स्मप्रति दानव फार माजती,
देवांवर झेंडा मिरवीती !-
देवांच्या मदतीस चला तर !      २०


मुंबई, २८ मार्च १८९३
मासिक 'मनोरंजन' वर्ष १६, अंक ७,
जानेवारी १९०१, पृ. १७०
'यथामूल आवृत्ती' १९६७, पहिली प्रत पृ. ८८-९१
दुसरी प्रत, पृ. ९२-९५

यापुढे दिलेली कच्च्या प्रतीतील क्र. ८,१०-१५ ही कडवी पक्क्या प्रतीमध्ये नाहीत.

जुन्या धरेवर नव तरु सुंदर,
जुन्या तरुवरि नवी कळी ती,
जुन्या कळ्यांतुनि फळें उपजती,
फळांतूनि त्या नवरस गळती
कां न म्हणावे मधुर खरोखर !            ८

उंच अशा बैसुनि तक्तावर
एका वैभवा थोर भोगितो,
धुळीमधें तो अन्य लोळतो,
हाल न कुत्रा त्याचे खातो !
काय असे ही स्थिती बरोबर ?            १०

वंदुनियां ह्या देवांलागुनि
धाईं धांईं मानव रडती !
पायपोस त्यां हाणा सम्पति !
देव कशाचे ! – अश्रु जे पिती
क्रूरतर न काते असुरांहुनि ?              ११

रुधिरा दानव, अश्रूंला सूर
पिती; रक्त हें देहामधुनी
वाहे, अश्रू पण मेंदूतुनि;
श्रेष्ठ अश्रु ते शोणिताहुनी;
असुरांहुनि हे देवाचि आसुर !            १२

स्त्रीवर्गाला दास्यीं दडपुनि,
दासीपुत्रचि मानव होतो,
स्त्रीला अज्ञानांत ठेवितो;
परिणामीं दुर्दशेत जातो,
धिक्कार अशा चालीलागुनि !           १३

पत्नीनिधनीं अन्य वरी नर,
परि पति मरतां स्त्रीचा, तीतें
बळेंचि देतो संन्यासातें
विसरुनि हें – जनिसाफल्यातें
अवश्य आहे संसृति भूवर !             १४

पडली छाया मनुजाची जर
विटाळ होतो तर मनुजाला,
व्हावें स्नानचि सचैल त्याला;
काय म्हणावें या मूर्खाला ?-
नरेंच केला हीन किती नर !            १५

केशवसुतांचा जीवनपट

फलक