फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

क्षणांत नाहीसें होणारे दिव्य भास

(कवि, चित्रकार आणि तानसेन यांस जी अलौकिक स्वप्नें, ज्या दिव्याकृति आणि जे गन्धर्वालाप भासमान होतात, - अहह! त्यांपैकी किती थोडे मात्र त्यांस आपल्या करामतीत गोवून ठेविता येतात बरे ! आत्माराम आणि आका कोण सांगावयास नकोच.)

(वृत्त – शार्दूलविक्रीडित)

आत्माराम सुखें वनामधुनि तो होता जरा हिंडत,
तों झाला बघता दुरुनि सहसा कोण्या सुमूर्तिप्रत;
तीच्यामागुनि मोहुनी हळूहळू जायास तो लागला,
“आहे ही पण कोण?” या क्षणभरी प्रश्नावरी थांबला !         १

“रम्भे !” “उर्वशि गे !” तशींच दुसरीं जीं त्यास होतीं प्रियें
नामें, त्यांतिल घेउनी फिरुनि तो बाही त्वरेनें तिये;
ता कांही तरिही वळे न, बघुनी तो विस्मया पावला;
जातां संनिध, “ही नवीनचि अहा ! कोणी दिसे” बोलला !   २

कांही नांव नवीन देउनि तिला जेव्हां तयें बाहिलें,
तों तीनें वळुनी प्रसन्न वदनें त्याच्याकडे पाहिले;
त्या रुपद्युतिनें दिपूनि नयनें, निर्वाण तो पावला;
तों अन्तहिंत, दृष्टिचा विषय तो, एका क्षणीं जाहला !        ३

आकाची इतुक्यांत हास परिसे आत्मा, घराला वळे;
आकाच्या हुकुमांत, साक्ष अवधी ती विस्मरुनी, रुळे;
कोणेका दिवशीं तिथेंच फिरतां ती गोष्ट त्याला स्मरे,
तच्चित्तीं, पण रुप नाम अथवा तीचें मुळींही नुरे !           ४

आत्माराम सखेद होउनि वदे तों आपणाशीं असें –
“कांही सुन्दर देखिलें खचित मीं, यामाजि शंका नसे !
हा ! हा !- हे जर सर्व भास धरतां येतील मातें, तर
पृथ्वीचा सुरलोक कीं बनवुनी टाकीन मी सत्वर !”         ५

मुंबई, २४ मार्च १८९३
करमणूक, २२ एप्रिल १८९३, पृ. २०४
काव्यरत्नावली, वर्ष १४, अंक ४,
एप्रिल १९०२, पृ. ५७-५८
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ८७

केशवसुतांचा जीवनपट

फलक