फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

स्वप्नामध्यें स्वप्न !

(जलधरमाला वृत्ताच्या चालीवर)

“All that we see or seem
Is but a dream within a dream”
- Edgar A. Poe.


हें चुम्बन निजमुखावरी माझें घे;
जातां जातां हें मज बोलूं दे गे :-

वाटे तुज कीं, माझे दिवस पळालें
स्वप्नापरि, तें खोटें नच गे बालें;

तथापि जर ती गेली आशा निघुनी
एका रात्रींतुनि वा दिवसामधुनी,

स्वप्नामधुनी किंवा न कशांतुनिही,
तर ती गेली कमती का गे कांही ?

सर्व अम्ही जें बघतों करितों वा जें
स्वप्नांतिल तें स्वप्नच, सखये माझे !

कल्लोळांच्या क्षोमें गर्जत आहे
तया सागरतीरीं उभा गडे ! मी आहें,

धरिले असती मी या स्वकरामाजी
स्वर्णवालुकाकण, जे नसती राजी :

किती थोडके ! परी कसे ते गळति – पहा ते पळती
माझ्या बोटांमधुनि, सागरा जाती;
माझ्या नेत्रांमधुनि, आंसवें चलति-आसवें गळती !

अहा ईश्वरा ! घट्ट मूठ ही वळुनी
पकडाया ते शक्त मी न कां म्हणुनी ?

अह्ह! ईश्वरा ! शक्ति  न कां राखाया
एकहि कण निर्घुण लाटेपासुन या ?

बघतों आम्ही करितों वा जें सारें
स्वप्नातिल तें स्वप्नच व्हावें का रे ?

१५ डिसेंबर १८९२
मासिक मनोरंजन, वर्ष ३ अंक ८,
फेब्रुवारी १८९८, पृ. १४२
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ८५

केशवसुतांचा जीवनपट

फलक