फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

मयूरासन आणि ताजमहाल

(वृत्त – शार्दुलविक्रीडित)

कामें दोन सुरेख त्या नुपवरें केलीं: - मयूरासनीं
ज्या तो बैसुनि शोभला; प्रथम तें, सा कोटि ज्या लागले,
राजे ज्यापुढते जुळूनि अपुल्या हस्तद्वया वांकले,
झाले कंपित, तत्करीं शिर असें, येऊनियां हें मनी;

प्रेमें मन्दिरही तसें निजसखीसाठीं तयें लावुनी
कोटी तीनच, त्या गभीर यमुनातीरावरी बांधिलें !
चोरें आसन तें दुरी पळविलें ! स्मर्तव्य कीं जाहले !
आहे अद्भुत तो महाल अजुनी तेथें उभा राहूनी !

विल्हेवाट अशीच रे तव कृती त्या सर्वदा पावती;
मत भ्रान्त नरा ! सदैव कितिही तूं धूप रे जाळिला
स्वार्थाच्या प्रकृतीपुढें – निजमनीं ही याद तूं जागती
राहूं दे- तरि धूर होइल जगीं केव्हांच तो लोपला !

काडी एकच गन्धयुक्त, नमुनी प्रीतीस तूं लाव ती,
तीचा वास सदा जगीं पसरुनी देईल तो तुष्टिला !

 

१३ नोव्हेंबर १८९२
करमणूक, १३ मे १८९३, पृ. २२८
काव्यरत्नावली, वर्ष १७ अंक ४,
एप्रिल १९०५, पृ. ६३-६४
'यथामूल आवृ्त्ती', १९६७, पृ. ८३

केशवसुतांचा जीवनपट

फलक