फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

दिवा आणि तारा

(वृत्त – शार्दुलविक्रीडित)

तार्‍याला जमिनीवरुनि वदला गर्वे दिवा हें असें :-
“अस्पष्ट द्युति ही किती तव ! तुझा रात्रौ कितीसा असे –
लोकांला उपयोग ? मी बघ कसा तेजा निजा पाडितों,
अंधारीं व्यवहार सर्वहि जगीं माझ्यामुळें चालतो !”                १


तारा तों वरुनी दिव्यास वदला गम्भीर शान्त स्वरें :-
“दीपा ! तूं म्हणतोस तें कवण तो लेखील खोटें बरें?
जी वस्तुस्थिती ती परन्तु बघतां आहे जरा वेगळी
अंधारावर तूझिया मम नसे बा ! योजना जाहली:”                २

“भांडीं, तीं मडकीं, डबे, - ढकलिसी अंधार यांपासुनी,
ब्रह्मांडांस परन्तु मी उजळितों, गेलीं युगें होउनी;
तेजानें वरुनी दिव्या ! खुलविसी तूं मानवी चेहरे,
आत्मे उज्ज्वल आंतले पण गड्या ! होतात माझे करें !          ३

“ज्ञाते, आणि भविष्यवादिहि, कवी, ते चित्रकर्ते तसे,
मत्तेजें फिरतात, अन्य जन ते तुझ्या प्रकाशें जसे;
तुझ्यासन्निध जो कवी लिहितसें त्यालाच तूं पूस रे –
दीपाच्या लिहितोस तूं द्युतिबलें कीं तारकाच्या बरें?”            ४


मुंबई, २६ सप्टेंबर १८९२
करमणूक, १ ऑक्टोबर १८९२, पृ. ३९५
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ८१


केशवसुतांचा जीवनपट

फलक