फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

शब्दांनो! मागुतें या!

(वृत्त – स्त्रग्धऱा)

तेजाचे पंख वार्‍यावरि हलवित ती चालली शब्दपंक्ति,
देव्हारा, शारदेचा उचलुनि गगनांतूनि ती नेत होती;
शब्दांही चित्तभूमी विकसित हिरवी तों मदीया बघूनी
देव्हारा माझिया तो उतरुनि हृदयीं स्थापिला गौरवूनी             १

शब्दांसगें तदा मीं निजहृदयवनामाजि संचार केला,
तेथें मीं कल्पपुष्पें खुड्डुनि नमुनि तीं वाहिली शारदेला,
शब्दांच्या कुजितानें सहजचि मम हृत्प्रान्त गुंगूनि गेला;
मी त्या स्वप्नांत गद्यग्रथित जग मुळीं लोटिलें तुच्छतेला !      २

रागानें या जगानें अह्ह ! म्हणुनियां शापिलें या जनाला,
तेणें चिन्तागि माझी हृदयहरितता नाशिता फार झाला;
गाणारे शब्द सारे झडकरि उडुनी दुरदेशास गेले,
वाग्देवीपीठ येथें परि मम हृदयीं दिव्य तें राहियेलें.              ३

वाग्देवी शारदे गे ! फिरवुनि अपुले शब्द पाचार येथें !
साहाय्यावीण त्यांच्या भजन तव कसें सांग साधेल मातें ?
आशामेघालि चिन्तानल अजि विझवूं जाहलीसे तयार,
शब्दांनो ! मागुते या ! बहर मम मनीं नूत्‍न येईल फार !       ४


१५ सप्टेंबर १८९२
करमणूक, ८ ऑक्टोबर १८९२, पृ. ४०३
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ८०

केशवसुतांचा जीवनपट

फलक