फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

कल्पकता

( खालच्या पद्यात वर्णिलेली देवी ती कल्पकता होय. सर्व जग आपल्या आहार-निद्नादी ठरीव व्यवसायात निमग्र असता ती एकांतात बसून भारतरामायणांसारखी काव्ये लिहिते, शाकुंतल, हॅम्लेट, फॉस्ट यांसारखी नाटके रचिते, गुरुत्वाकर्षणासारखे गहन शास्त्रीय सिद्धांत सुचविते, आणि एडिसनच्या ध्वनिलेखकासारखी यंत्रें तयार करिते. तेणे करुन नवीन आयु:क्रम पृथ्वीवर सुरु होतो, आणि स्वर्ग पृथ्वीला जवळ होतो.)

(वृत्त – शार्दूलविक्रीडित)

खा, पी, नीज, तसा उठून फिरुनी तें तेंच जा चिन्तित –
आवर्ती जग या ठरींव अपुल्या होतें हळू रांगत;
एका दुर्गम भूशिरावरि, परी देवी कुणी बैसली,
होती वस्त्र विणीत अद्भुत असें, ती गात गीतें भलीं.             १

होते शोधक नेत्र, कर्णहि तिचे तीक्ष्ण भारी तसे,
होते भाल विशाल देवगुरुनें पूजा करावी असें.
सूर्थाचीं, शशिचीं सुरम्य किरणें घेऊन देवी सुधी
होती गोंवित, इंद्रचापहि तसें, त्या दिव्य वस्त्रामधीं;           २

मेघांच्याहि छटा, तशीच कुटिला विद्युत, तसे ते ध्वनि
लाटा, पाऊस, पक्षि ते धबधबे-यातें पटीं ती विणी;
तारांचे पडणें, तसें भटकणें केतुग्रहांचे, पहा,
सारे सुन्दर, भव्य, घेउनि तिनें तें वस्त्र केलें अहा !           ३

आली भू कुतुकें तिथें तिस तिनें तें वस्त्र लेवीवलें;
तों त्या वृद्ध वसुंधरेवरि पहा! तारुण्य ओथंबले;
भूदेवी, मग हृष्ट होउनि मनीं, नाचावया लागली,
‘आतां स्वर्ग मला स्वयेंच वरण्या येईल !’ हें बोलली.        ४

दादर, १७ फेब्रुवारी १८९९
करमणूक, २१ फेब्रुवारी १८९९, पृ. १३९
काव्यरत्नावली, वर्ष १४ अंक ३, मार्च १९०२, पृ. ४३-४४

केशवसुतांचा जीवनपट

फलक