फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

त्वत्प्रीतीस अपात्र हा जन

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)

त्वत्प्रीतीस अपात्र हा जन तुला कालान्तरीं वाटला,
तोडावा तुजला मदीय जर हा संबन्ध गे लागला,
माझी हस्तक जोडुनी तर तुला विज्ञापना ही असे
( ती तूं मान्य करीं म्हणूनि तुज मी हा दास याचीतसें) :-      १

बोटें मोडुं नको, तसे मजवरी डोळे वटारुं नको,
आंठ्या घालुं नको, प्रसन्नमुखता देऊं चळूं ती नको,
मातें ती अवधीरणा, जिवलगे, दावावया लौकरी,
पायानें झिडकारणें न बरवें मातें गमे सुन्दरी     !               २

कां की, तूं प्रणयें बिघाड लटिका जेव्हां मशीं दाविसी,
त्या वेळीं असले प्रकार बहुधा तूं लाडके ! योजिसी;
यालागूनि जंधीं प्रकार तसले पाहीन तूझेवरी,
तेव्हां ते मज भासतील अवघे सव्याज, साचे जरी.              ३

कण्ठीं घालुनि हात, चुम्बन हळू माझें गडे ! तूं करीं,
मेरी जान् ! गुलगार ! सांग निघुनी जायास मातें दुरी !
तेणें त्रास तुला मुळीं न पडणें होईल माझे करें,
कां कीं तें तव सांगणें मज गडे वाटेल तेव्हां खऱें !              ४

मुंबई, १५ डिसेंबर १८९०
करमणूक, २० डिसेंबर १८९०, पृ. ६८

केशवसुतांचा जीवनपट

फलक