फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

फुकट दवडलेला तास

(वृत्त – शार्दूलविक्रीडित)

यंत्रीं कालनिदर्शनीं खणखणां ठोके पडूं लागले,
तों माझ्याजवळूनि कोणि उठलें ऐसें मला वाटलें;
मी तें कोण म्हणूनि जों निरखण्या वेगें उभा राहतों,
दारांतूनहि पदें सरोष निघुनी जातां तधीं ऐकतों.              १

न्याहाळूनि विलोकितां मज पुढें आकार आभासला,
पाठीला फिरवूनि तो मजकडे होता झणीं चालिला;
मी, पाठीवर त्याचिया ‘फुकट जो घालविला तास तो !’
ज्वालांहीं लिहिलें, असें निरखितां, तो गुप्तता पावतो !        २

‘धिड् माम’ बोलत अश्रू ढाळित, पदें मागें जरा गाळित,
पश्चात्ताप अधोमुखें मजमधें तो जाय संचारत;
तों कोणीं मधुर स्वरें मज हळू सम्बोधिलें ऐकतां,
किंचित् नेत्र धरुनियां उचलुनी मी जाहलों पाहता:            ३

आशा आणि तिची बहीण कविता ह्या घेउनी पातला
तो मी ‘तसा नवा’ बघूनि जवळी मोदें नमस्कारिला;
‘आतां व्यर्थ रडूनि काय फळ रे ?’ आशा असे बोलली,
‘बा, कांहीतरि गा नवीन !’ कविता आज्ञापिती जाहली !     ४

मुंबई, ९ ऑगस्ट १८९०
करमणूक, ८ नोव्हेंबर १८९०, पृ. २२
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ६०

केशवसुतांचा जीवनपट

फलक