फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

सिंहावलोकन

(वृत्त – पृथ्वी)

मुखा फिरवुनी, जरा वळुनि पाहतां मागुती,
कितीक हृदयें वदा चरकल्याविणें राहती?
‘नको वळुनि पाहणें !’ म्हणुनि दृग् जरी आवरुं,
धुकें पुढिल जाणुनी मन न घे तसेंही करुं !                १

प्रदेश किति मागुते रुचिर ते बरें टाकिले,
कितीक तटिनीतटें, श्रम जिथें अम्हीं वारिले !
किती स्मृतिस धन्यास्पद वनस्थली राहिल्या,
जिथें धवलिता निशा प्रियजनांसवें भोगिल्या !          २

सुखें न मिळतील ती फिरुनि ! तीं जरी लाविती
मनास चटका, तरी नयन त्यावरी लोभती.
परन्तु हृदयास ते त्वरित जाउनी झोंबती,
प्रमाद दिसता असे, नयन हे मिटूं पाहती !               ३

किती घसरलों !- किती चुकुनि शब्द ते बोललों!-
करुनि भलतें किती पतित हंत ! हे जाहलों !
स्वयें बहकुनी उगा स्वजनमानसें टोंचिलीं !
वृथा स्वजनलोचनीं अह्ह ! आंसवें आणिलीं !           ४

चुकोनि घडलें चुको: परि,, ‘असें नव्हें हें बरें’
वदूनिहि कितीकदां निजकरेंचि केलें बरे !
म्हणूनिच अम्हांपुढें घनतमिख सारें दिसे,
पुढें उचलण्या पदा धृति मुळींहि आम्हां नसे !           ५

‘चुकी भरुनि काढणें फिरुनि, हें घडेना कधी’
विनिष्ठुर असें भरे प्रगट तत्त्व चित्तामधीं ! –
म्हणूनि अनिवार हें नयनवारि जें वाहतें,
असे अह्ह ! शक्त का कवणही टिपायास तें ?            ६

वळणे, ३ मे १८९०
मासिक मनोरंजन, वर्ष २, अंक ४,
ऑक्टोबर १८९६, पृ. ८०
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ५९

केशवसुतांचा जीवनपट

फलक