फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

स्वप्न

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)

प्रीतीला विरही दशा कठिण ही मीं फार गार्‍हाणिली,
हंसाचे मग पक्ष ती द्रवुनिया देती मला जाहली;
आनन्दें प्रणती तिला करुनि मीं स्कन्धांस ते लाविले,
वेगानें मग अन्तरालभवनीं उड्डाण मीं मारिले !              १

आशेचा चमके जसा किरण तो चिन्तांमधीं आगळा,
तैसा तारक मेघवेष्टित तरी तेजाळ मीं पाहिला;
त्यां तार्‍यावरि जाउनी उतरलों, चिन्तीत हें मानसीं –
भेटूं केंवि निजप्रियेस ? रमवूं शब्दीं तियेला कशी ?          २

ऐशामाजि सखी, परीपरि तिथें उड्डाण घेऊनियां –
आली; कोण असे समर्थ मग त्या सौख्यास वर्णावया !
वक्षें दोनहि चार ओष्ठहि तधीं एकत्र झाले जवें
पायांखालुनि जाय हाय! तुटुनी तारा परी तो सवें !           ३

हा ! हा ! मी पडलों तसा घसरुनी या क्लिष्ट पृथ्वीवरी,
त्या धक्क्यासरशी मदीय सगळी गुंगी पळे हो दुरी ! –
माझ्या या हृदयावरी ममचि हे वेंगूनि होते कर,
हंसाची नव्हतीं पिसें चढविलीं या दोन बाहूंवर !             ४

मुंबई, २५ जानेवारी १८९०
मनोरंजन आणि निबंधचंद्रिका,
वर्ष ५, अंक ४, ऑक्टोबर १८९१, पृ.१
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ५६

केशवसुतांचा जीवनपट

फलक