फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

कविता आणि प्रीति

(वृत्त – भुंजगप्रयात)

फिरायास मी मित्र घेवोनि गेलों;
बघोनी सुरम्य स्थळा एक ठेलों;
किती हारिनें वृक्ष ते दाट होते,
जलाचे तळीं पाट होते वहाते;                      १

तुणाच्या मधीं राखिल्या गार जागा
कडेनें तयांच्या, लतांच्याहि रांगा –
फुलांच्या बहारांत त्या शोभताती;
अलींचे थवे त्यांवरी धांव घेती;                   २

मधूनी किती पक्षि ते गोड गाती;
मृगेंही मधें स्वैर तीं क्रीडाताती;
मयूरें अहा ! दाखवीती पिसारे;
बघूनी मना तोष होई अहा रे !                    ३

मधें अंगना, स्पृष्ट ज्या यौवनानें,
निजाऽव्याजरुपास साध्या मदानें
इथूनी तिथें चंचला नाचवीती,
पदालंकृती झंकृती तैं करीती;                    ४

मुलें खेळती नाचतीही मजेनें,
तयांचा अहो कोण उल्हास वाने ?
फुलें, तारका, ते दंवाचे तुषार,
तशीं मुग्ध ही बालकें दिव्य फार !              ५

अशी तेथली पाहुनी रम्य लीला,
मुखीं घालुनी ठाकलों अंगुलीला;
वदे मित्र मातें – “पुढें चालणें ना ?”
परी पाय तेथूनियां काढवेना !                  ६

(वृत्त-वसंततलिका)
बोले सखा “गढुनि कां इतुका मनीं तूं?”-
मी बोललों “बघ मनांत विचारुनी तूं.”
तेव्हा पुसे “अडविते कविता?” – नव्हे रे,
प्रीति मला भुलविते – नच हाल रे !”        ७

मुंबई, ७ जानेवारी १८९०
करमणूक, २ नोव्हेंबर १८९०, पृ. १३
काव्यरत्नावली, वर्ष १६, अंक ३, मार्च १९०४, पृ. ४८
'यथामूल आवृत्ती', १९६७, पु. ५५

केशवसुतांचा जीवनपट

फलक