फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

माझा अन्त

(वृत्तवैचित्र्य)

मीं पाहिली एक सुरम्य बाला;
वर्णूं कसा त्या स्मरसम्पदेला ?
वृक्षावरी वीज जधीं पडावी,
त्याच्या स्थितींतचि तिची महती पहावी.         १

माझी अवस्था बघुनीच तीचें
सौन्दर्य सोपें अजमावयाचें;
वस्ताद जी चीज जगीं असावी,
तीचें स्वरुप सगळें परिणाम दावी.                २

सौन्दर्य पुष्पासम वर्णितात,
झालें मला कंटकसें प्रतीत;
सौन्दर्य मानोत सुधानिधान,
तें जाहलें मज परन्तु विषासमान !              ३

नेत्रें क्षणीं तारवटून गेलीं,
अंगें ज्वरीं त्या परतंत्र झालीं,
झालों तिला ती बघतां भ्रमिष्ट,
शुद्धी सवेंचि मग होय अहा विनष्ट !             ४

माझा असा अन्त अहो जहाला!
‘कोठुनियां हा मग येथ आला?’-
ऐसा तुम्हां संशय येतसे का?
मी भूत हें मम असें, नच यांत शंका !         ५

मुंबई, ४ जानेवारी १८९०
मासिक मनोरंजन, वर्ष ४, अंक १
जुलै १८९८, पृ. १९
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ५४

केशवसुतांचा जीवनपट

फलक