फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

रा.रा.बळवंत आपाजी दाते यांस

(वृत्त – शार्दूलविक्रीडित)

(खालील श्लोक सदरहू दाते याचे एक साप्ताहिक सभेतील भाषण ऐकिल्यावरुन इ. १८८९ साली पुण्यास लिहिले, पुढे ते फर्ग्युसन कॉलेजातील विद्यार्थी असता महाडास तळ्यात बुडून वारल्याचे ऐकिले. ही दु:खाची गोष्ट बहुधा १८९१-१८९२ साली घडली असावी.)

दाते! धन्य तुझी तुला प्रसवुनी माता असे जाहली.
ज्या अर्थी हृदयीं तुझ्या जळतसे भूतातृभक्ति भली
त्वन्नेत्रीं चमके तडीत् अभिनयीं वारें अहा! खेळतें,
उद्भारांतुनि गर्जना निघुनियां ती या जना स्तम्भिते !        १

जोराची तव शब्दवृष्टि पडतां आत्म्यावरी माझिया
चिन्ताग्रीष्म समग्रही धुपनियां तो जाय तेथूनियां;
‘देशालागुनि आपुल्या सुदिन ते येतील केव्हांतरी,
आशांचे असल्या सदंकुर पहा! येती मदातम्यावरीं !         २

होती श्रेष्ठ पदास आर्यजननी जी एकदा पावली,
दुदैवें परि जी विपद्गणशती सध्या असे गांजिली,
तीचें दु:ख जरा तरी शमविण्या, आम्हांस या भूवरी
ढाळायास सखेद लोचन जलें तूं धीर आज्ञा करी !           ३

टाकी हाणुनी आमुची शिथिलता वक्तृत्ववज्रे तव
स्फूर्तीनें निज त्या स्वबांधवजना सामर्थ्य दे तूं नव;
“ऐसे बांधव काय हो बघतसां ! आतां उठा लौकरी!”
कर्तव्यास जनांस जागृत करीं शब्दीं अशा निर्भरी !         ४

“हे आम्ही उठलों ! चला तर पुढें ! देशार्थ कायीं मरुं !
या त्वप्रेरित के समुत्सुक वचीं व्योमावकाशा भरुं !
“जैजैकार असो तुझा भरतभू !” हा घोष जेव्हा करुं,
जैजैकारुनि नामहि प्रिय तुझें दाते ! तधीं आदरुं !         ५

'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ५२

केशवसुतांचा जीवनपट

फलक