फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

प्रयाणगीत

(चाल – पांडुकुमारापार्थनरवरा)

तुजविण मजला कांहिं असेना प्रिय या गे जगतीं;
तूं मम जीवित, तूं मम आत्मा, तूं माझी शक्ती !      १

तुजला सोडुनि जाणें येई, सखे ! जिवावरती,
परी ओढुनी दूर नेति या, निर्दय दैवगती !             २

प्रीती जगाचें वसन विणितसे वामांगीं ढकली –
धागा, परि तो परतुनि उजविस भेटतसे कुशली !     ३

मेघ विजेला नभीं सोडुनी खालीं ये, परि तो
रविदीप्तीच्या दिव्यरथीं तिज भेटाया वळतो !         ४

रवि, पूर्वेला रडत सोडुनी, कष्टें मार्ग धरी,
प्रहरामागें प्रहर लोटतां तिजला घे स्वकरी !           ५

धरेस सोडुनि गिरि जरि वरि ते उंच नभी चढले
तरी खालते कालगतीनें येती प्रेमकले !                 ६

प्रीतीचा पथ वर्तुळ आहे, नर त्यानें जातां
मागें असल्या प्रियेचिया तो सहजचि ये हाता !       ७

धीर धरोनी आटप, म्हणुनी, बाष्पें मजसाठीं,
ठसा प्रीतीचा ठेवुं शेवटीं ये ग गडे ! स्वोष्ठीं !          ८

११ जानेवारी १८८९
मासिक मनोरंजन, वर्ष २, अंक २,
ऑगस्ट १८९६, पृ. ३८
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ४६

केशवसुतांचा जीवनपट

फलक