फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

मजुरावर उपासमारीची पाळी

(वृत्त – इंद्रवंशा)

धारेवरी जाउनि देव पोंचला,
हा रंगही मावळतेस साजला,
सर्वत्र ही मौज पहा ! दिसें; परी
माझ्याच कां दु:ख भरे बरें उरीं ?            १

सार्‍या दिनीं आजचिया नसे मुळीं
हातास माझ्या कवडीहि लाभली;
पोटा, करोनी मजुरीस, मी भरी;
कोणीं दिलें आज न काम हो परी !          २

ही मन्दिरें हो खुलतात चांगली;
माझ्या वडीलींच न काय बांधिलीं?
मी मात्र हो आज मरें भुकेमुळे;
श्रीमंत हे नाचति मन्दिरीं भले !            ३

हेवा तयांचा मजला मुळीं नसे,
जाडी मला भाकर ती पुरे असे;
कष्टांत देवा ! मरण्यास तत्पर,
कां मारिसी हाय ! भुकेमुळें तर ?           ४

सर्वांस देवा ! बघतोसि सारखा,
होतोस कां रे गरिबांस पारखा ?
कांहींस सुग्रास सदन्न तूं दिलें,
साधी अम्हां भाकरही न कां मिळे ?       ५

घेवोनि चार अपुल्या पिलांप्रती
जाती अहा ! पक्षि सुखी घरीं किती;
बाळांस हें दावुनि कारभारिण
कैसें तयां देत असेल सांगुन ?-            ६

“पक्षी जसे हे घरट्यास चालती
घेवोनि चार अपुल्या पिलांप्रती,
घेवोनि अन्ना, तुमचा तसा पिता
येईल तो लौकरि हो, रडूं नका!”           ७

हे लाडके ! आणिक लाडक्यांनो !
दांवू तुम्हां तोंड कसें फिरोन ?
जन्मास मी काय म्हणोनि आलों ?
येतांच वा कां न मरोनि गेलों ?           ८

७ जानेवारी १८८९
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ४५-४५

केशवसुतांचा जीवनपट

फलक