फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

काल आणि प्रियेचें सौंदर्य

(वृत्त-शार्दूलविक्रीडित )

धातू दार्ढ्यविशिष्ट, अश्म, धरणी, विस्तीर्ण हा अंबुधि
मर्त्यत्वा चुकवावयास शकती हें तों घडेना कधी;
पुष्पाहूनिही फार पेलव जिची शक्ती अशी चारुता
या हो मर्त्यपणापुढें तगुनियां कैशी रहावी अतां?             १

मोठे उच्च शिलासमुच्चय, चढूं कोणा न ये ज्यांवरी, -
लोहाचे प्रतिहार थोर अथवा, - हा काल त्यांतें चुरी;
त्याअर्थी दिवसांचिया कठिण या धक्काबुकीच्या पुढें
ही वासन्तिक गन्धवीचि टिकणें हें कोठुनी हो घडे?         २

कालाचें अति रम्य रत्‍न लपुनी, कालाचिया थोरल्या
पेटीपासुनि दूर. राहिल कसें स्थानीं बरें कोणत्या?
त्याचा पाय चलाख बांधुनि कुणी ठेविल का हो कर?
सौन्दर्या लुटितां तयास अडवी आहे असा का नर?-         3

कोणीही नं! परंतु एक सुचते आहे मला योजना
(होवो ती सफला म्हणूनि करितों ईशास मी प्रार्थना) : -
काळ्या शाइमधे प्रियेस अपुल्या मी कागदीं ठेवितों;
तेथे अक्षयरुपिणी सतत ती राहो असें इच्छितों!            ४

 

डिसेंबर १८८८
करमणूक, १० जानेवारी १८९९ पृ. ९२-९३

केशवसुतांचा जीवनपट

फलक