फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

रा.वा.ब. पटवर्धन, मु. नागपूर, यांस

(शिखरिणी)
प्रगल्भा त्या नारी मधुर जगती साच असती,
परी व्रीडायुक्ता मधुरतर मुग्धाचि गमती;
बिजेची ती ये ना कधिंहि पुनवेला अणु सरी,
बरी ही या ठायीं सरस उपमा लौकिक खरी.                     १

(शार्दूलविक्रीडित)
किंवा, त्या युवती जधीं पतिचिया नामास घेती मुखें
तेव्हां तें परिसूनियां जन जरी हे डोलती हो सुखें,
तें घ्याया तरि त्या मुखा फुलविती तेव्हां वरौष्ठांतुनी
अव्यक्त ध्वनि जो निघे प्रिय खरा तो फार होतो जनीं.        २

(मंदाक्रांता)

तैशी तूझी मधुर कविता गाइल त्वद्यशाला,
लोकांमध्यें प्रिय करिल ती आपुल्या गायनाला;
आरम्भींचे परि परिसुनी बोल हे मुग्ध तीचे,
भूरि प्रेमें हृदय भरुनी डोलतें फार याचें.                         ३

(वंशस्थ)
आहे तुला सर्वहि सृष्टि मोकळी;
व्योमांतली सर्वहि तेंवि पोकळी;
संचार कीजे तरि तूं स्वमानसें,
कोठे जराही प्रतिबन्ध तो नसे.                                 ४

(इंद्रवंशा)
या अन्तरालांतिल तारकांत
आत्मे कवीलागुनि दीसतात;
कांचेमधूनी दिसते जनांला,
धोंड्यामधूनीहि दिसे कवीला !                                  ५

(वसंततिलका)
निर्जीव वस्तु तर लाव वदावयाला,
जन्तूंस लावहि विचार करावयाला,
आम्हां शिकीव सुवचीं सुर व्हावयाला,
पृथ्वीस सांग अमरावति जिंकण्याला !                        ६

(शार्दूलविक्रीडित)
किंवा, हें तुजला कशास म्हणुनी सांगावया पाहिजे ?
हा माझा घडला प्रमादचि, वरी बोलिलों तूज जें;
डोळ्यांला बघण्या तसें शिकविणें कानांस ऐकावया,
हें हास्यार्ह जसें, तसें पढविणें शाहीर आहे तया,            ७

(रथोद्धता)
ऐकती न बघती न जें जन,
गम्य होयचि कवींस तें पण;
हे म्हणूनि नरजातिचे खरे
नेत्रकर्णचि नव्हेत का बरें ?                                   ८

(शिखरिणी)
जगावं तूं वर्षे प्रिय मम कवें ! शंभर पुरीं,
समृद्धी सौख्याची चिव तव वसावी घरभरी,
जर स्वास्य़ीं तूझीं सुरस कवनें सुन्दर धरो,
भविष्यीं कालीं ते शुचि यश तुझें निश्चल ठरो!             ९

(माल्यभारा)
कविता करितां मला न येई,
रचिले हे गण हो परन्तु कांही;
म्हणुनी करुनी क्षमाचि मातें,
करणें स्वीकृत मन्नमस्कृतींतें !                            १०

'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ३८-३९

केशवसुतांचा जीवनपट

फलक