फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

ईश्वराचा ग्रन्थ

“Of this fair volume which we World do name.”
W. Drummond

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)

हें हो पुस्तक रम्य ज्यास ‘जग’ ही संज्ञा अम्हीं दीधली,
आस्थापूर्वक पत्रकें जर अम्हीं त्याचीं भलीं चाळिलीं,
केलें पुस्तक हें जयें, जपुनि जो शुद्धीहि याची करी.
बुद्धी थोर, अपूर्व ही कुशलता वाचूं तयाची तरी.                    १

त्याची शक्ति, अतीव अद्भत अशा शक्तीहि जी दाबिते,
त्याची पालक दृष्टि अप्रतिहता सर्वत्र जी पोंचते,
त्याचा न्याय न जो क्षमा करितसे गर्विष्ठ दुष्टां कधीं,
वाचूं हीं सगळीं अखण्डित अशीं प्रत्येक पत्रामधीं,                 २

हा! हा! आम्हि परन्तु मूर्ख सगळे, त्या अज्ञ बालांपरी
पुठ्ठे रंगित, पत्रकें कनकितें, आनन्दतों यांवरी;
गौणाला पुरवूं स्वलक्ष्य, अवघें उत्कृष्ट टाकूनियां !
त्या मोठ्या कविचा अम्ही न झटतों इष्टार्थ जाणावया            ३

(वृत्त –अनुष्ठुभ)

किंवा दैववशात् कांहीं
पाहिलें पुस्तकांत या,
तर तें बहुधा चित्र
कडेला पृष्ठकाचिया !

'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ३७

केशवसुतांचा जीवनपट

फलक