फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

अत्यंजाच्या मुलाचा पहिला प्रश्न

(वृत्त-भुजंगप्रयात)

मुलें अंत्यजांचीं बिचारीं मजेनें
पथाच्या अहो खेळताती कडेनें
दुरुनी तिथें विप्र डौलांत आला,
वदे काय तो मुग्ध त्या बालकांला :-

“सरा रे दुरी पोर हो म्हारड्यांचे !
चला ! खेळ हे मांडले डोंबलाचे !
निघा ! वाट द्या लौकरी ब्राह्मणातें !”
पळालीं मुलें ; कोण राहील तेथें !

परी एका त्यांतील तैसाचि ठेला;
उगारी तधीं दुष्ट तो यष्टिकेला.
म्हणे – “गाढवा ! सांवली ना पडेल!”
दुरी हो !- पहा हाच खाऊ मिळेल !”

तधीं बाळ तोही घराला निघाला,
मनीं आपुल्या या करी चिन्तनाला :-
“ जरी त्यावरी सांवली माझि गेली
तरी काय बाधा असे ठेविलेली ?”

घरीं जाउनी तेंचि माते विचारी;
वदे तेधवां त्यासि मात बिचारी :-
“अन्हा नीच बा, आणि ते लोक थोर;
तयां पाहतां होइजे नित्य दूर.”

सुधें बोलली ! – हें परी काय तीतें
कळी की जगी नाडुनीयां परांते,
म्हणूनी करुनी अधीं घोर पाप,
जनीं गाजवी मानवी स्वप्रताप !

३ सप्टेंबर १८८८
मनोरंजन आणि निबंधचंद्रिका
वर्ष ४, अंक ५, नोव्हेंबर १८८९, पृ. १२६-१२७
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ३४

केशवसुतांचा जीवनपट

फलक