फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

एख खेडे

(जाति –दिंडी)

सह्यगिरिच्या पायथ्याला सुपीक
रम्य खोरें कोंकणामधीं एक;
नदी त्यामधुनी एक वाहताहे,
एक खेडें तीवरी वसुनि राहे.                        १

वरुनि सुन्दर मन्दिरें न त्य ठायीं,
परी साधीं झोपडीं तिथें पाहीं;
मन्दिरांतुनि नांदते रोगराई,
झोपड्यांतुनि रोग तो कुठुनि राही?               २

रोग आहे हा बडा कीं मिजासी,
त्यास गिर्द्यांवरि हवें पडायासी;
झोंपड्यांतील घोंगड्यांवरी त्यास,
पडुनि असणें कोवलें सोसण्यास ?                ३

उंच नाहिंत देवळें मुळी तेथें,
परी डोंगर आहेत मोठमोठे;
देवळीं त्या देवास बळें आणा,
परी राही तो सृष्टिमधें राणा.                      ४

उंच डोंगर ते, उंच कडे भारी,
पडे धो! धो! ज्यांचियावरुनि वारी,
भोंवतालें रान तें दाट आहे;
अशा ठायीं देव तो स्वयें राहे !                   ५

स्तोत्र ओढे थांबल्यावीण गाती,
सूर वारे आपुला नित्य देती,
वृक्षगण तो नाचुनी डुल्लताहे;
अशा भक्तीच्या स्थळीं देव राहे!                  ६

अशी नैसर्गिक भव्यता उदास
तया खेड्याच्या असे आसपास;
तसा खेड्याचा थाट तोहि साधा
भव्यतेला त्या करितसे न बाधा:                ७

सरळ साधेपण असे निसर्गाचें
मूल आवडतें; केंवि तें तयाचें
भव्यतेला आणील बरें बाधा ?
निसर्गाचा थाटही असे साधा.                    ८

लहान्या तया गांवांत झोंपड्यांत
भले कुणबी लोक ते राहतात;
खपोनीयां ते सदा सुखें शेतीं,
सरळ अपुला संसार चालवीती.                 ९

अहा! अज्ञात स्थळीं अशा, मातें,
एक गवतारु खोप रहायातें,
शेतवाडी एक ती खापायाला,
लाधतीं, तर किति सौख्य मन्मनाला!        १०

तरी नसतों मी दरिद्री धनानें,
तरी नसतों मी क्षुद्र क्षिणनानें,
तरी होतीं तीं स्वर्गसुखें थोडी,
तरी नसती कीर्तिची मला चाडी !              ११

पुढे वाचा...

केशवसुतांचा जीवनपट

फलक