फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

कविता आणि कवि

(वृत्त-उपजाती)

अशी असावी कविता, फिरुन
तशी नसावी कविता, म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
अहांत मोठे? - पुसतों तुम्हांला               १

युवा जसा तो युवतीस मोहें
तसा कवी हा कवितेस पाहे;
तिला जसा तो करितो विनंति
तसा हिला हा करितो सुवृत्तीं.                २

लाडीगुडी चालव लाडकीशीं
अशा तर्‍हेने, जरि हें युव्याशीं
कोणी नसे सांगत, थोर गौरवें
कां ते तुम्ही सांगतसां कवीसवें ?           ३

करुनियां काव्य जनांत आणणें,   
न मु्ख्य हा हेतु तदीय मी म्हणें;
करुनि तें दंग मनांन गुंगणें,
तदीय हा सुन्दर हेतु मी म्हणें.             ४

सभारुची पाहुनि, अल्प फार
रंगीं नटी नाचवि सूत्रधार;
त्याचें तयाला सुख काय होय ?
तें लोकनिन्दाभयही शिवाय!               ५

नटीपरी त्या कविता तयाची
जनस्तुती जो हृदयांत याची :
पढीक तीचे परिसूनि बोल
तुम्ही कितीसे भुलुनी डुलाल ?            ६

स्वभावभूयिष्ठ जिच्यांत माधुरी,
अशी तुम्हांला कविता रुचे जरी,
कवीस सोडा कवितेबरोबरी, -
न जाच वाटेस तयाचिया तरी.             ७

तयाचिया हो खिडकीचिया, उगे,
खालीं, तुम्ही जाउनि हो रहा उभे; -
तिच्या तयाच्या मग गोड लीला
ऐकूनि, पावाल तुम्ही मुदाला !            ८

 

३० डिसेंबर १८८६
करमणूक, १० जानेवारी १८९९, पृ. ९३
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ८-९

केशवसुतांचा जीवनपट

फलक