फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

हरपलें श्रेय

(उदात्त बुद्धीला संसारात राम नाही. अलौकिक असे जे काही तिला पाहिजे असते, ते तिच्या हक्काचे असून देखील, त्याच्या प्राप्तीकरिता तिला झुरत पडावे लागत नाही काय?)

गाणे

त्रिखंड हिडुनि धुंडितसें,
न परि हरपलें तें गवसें ! ध्रु.
होत्यें अजाण माहेरीं
तों खेळ खेळल्यें परोपरी,
लटूपटीच्या घरदारीं
लटकीच जाहल्ये संसारी;
तेव्हांचे सुख तें आतां
खर्‍या घरींहि न ये हाता !

चुक चुकल्यापरि
वाटे अन्तरिं,
होउनि बावरि
निज श्रेय मी पाहतसें,
न परि हरपलें तें गवसे !               १

प्राप्त जाहलें तें तुजला
तूं मागितलें जें देवाला,
ज्याचें मोल तुवां दिधले
तेंच तुझ्या पदरीं पडलें –
या वचनें चुकला सौदा
उमगुनि हृदया दे खेदा!
दिलें हिरण्मय,
हातीं मृण्मय;
हा हतविनिमय!
परत मला मम मिळे कसें?
न परि हरपलें तें गवसे !              २

किरण झरोक्यांतुनी पडे,
अणूंसवें त्यांतून उडे-
परीक्षविषयीं मन माझें
विसरुनियां अवधीं काजें;
हयगय त्यांची मज जाची
परि न मला पर्वा त्याची !
वेडी होउन
बसल्यें अनुदिन
एकच घेउन-
मज माझें लाभेल कसें ?
न परि हरपलें तें गवसे ?            ३

जेथें ओढे वनराजी
वृत्ति रमे तेथें माझी;
कारण कांही साक्ष तिथें
मम त्या श्रेयाची पटते;
म्हणुनी विजनीं मी जात्यें,
स्वच्छन्दे त्या आळवित्यें.
स्वभास दावुनि
परि तें झटदिनिं
जाई लोपुनि !
मग मी हांका मारितसें !
न परि हरपलें तें गवसें !            ४

भीड भाड माझी फिटली,
जग म्हणतें कीं ‘ही उठली!’
जनमर्यादा धरुनि कसें
अमर्याद तें मज गवसे ?
एक शब्द बोलेन जरी
सकलां कुण्ठित करिन तरी !
अशी आगळी
परी बावळी
आहें दुबळी;
कांकीं त्याविण सुचत नसे !
न परि हरपलें तें गवसे !            ५

स्वपतिचितेवरि उडी सती
संसृतिविमुखी घेई ती;
दीपशिखेवरि पतंग तो
प्रेमें प्राणाहुति देतो;
मी न करिन ता तेंवि तधीं
माझें मज लाभेल जधीं ?
मजपासोनी
हाय ! हिरोनी
नेलें कोणीं!-
म्हणुनि जीव पाखडीतसें !
न परि हरपलें तें गवसें !            ६

केशवसुतांचा जीवनपट

फलक