फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

गोंफण केली छान!

(जाति-दोहा)

स्वहृदय फाडुनि निज नखरीं,
चिंवट तयाचे दोर
काढुनि, गोंफण वळितों ही
सत्वाचा मी चोर !               १

त्वेषाचा त्या दोराला
घट्ट भरुनियां पीळ,
गांठ मारितों वैराची
जी न पीळ दवडील !            २

वैर तयांला, बसती जे
स्तिमितचि आलस्यांत
वैर तयांला, पकळ जे
बडबडती तोर्‍यांत !              ३

वैर तयांला, वैरी जे
त्यांच्या पायधुळींत
लोळुनि कृतार्थ होती जे
प्राप्त तूपपोळींत !                ४

वैर तयांला, पूर्वीच्या
आर्यांचा बडिवार
गाउनि जे निज पंढत्वा
मात्र दाविती फार !             ५

वैर तयांला, थप्पड बसतां
चोळिति जे गालांस,
वैर तयांला, जे गरिबी
शिकवितात बालांस !          ६

गांठ मारुनी वैराची
गोंफण केली छान;
कठिण शब्द या धोंड्यांनीं
करितों हाणाहाण !            ७

मासिक मनोरंजन, वर्ष १०, अंक ७,
जानेवारी, फेब्रुवारी १९०५, पृ. ३३७

केशवसुतांचा जीवनपट

फलक