फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

प्रतिभा

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)

ती अत्यद्भुत गूढ शक्ति सहसा संचारतां अंतरीं,
मुक्तात्मा गगनीं उडे, बिथरतो इन्द्राश्व तें पाहुनी;
दैत्यांचें बल देवसत्त्वहि तसें अंगी चढे त्या क्षणीं;
सायुज्यत्व विराट पुरूष अहा ! देतो स्वयें लौकरी,
स्वान्तीं मण्डल जें हिरण्मय तधीं दिव्य प्रभा विस्तरी,
त्याच्या पाजळिती अरांवरि सुखें देव स्वशस्त्रें जुनी;
येती दानव मोहुनी दुरुनि जे त्याचेकडे धांवुनी,
ते नाशाप्रत पावती झडकरी तेथें पतंगांपरी !
पिण्डीं जाय विलोपुनी विरुनियां ब्रह्माण्ड हें सत्वर;
शब्दब्रह्म उचंबळून मग जें दाही दिशा व्यापितें,
त्यांच्यांतून भविष्यवाद निघती, ऐकून ते सादर;
ब्रह्मयातें क्षमता नवीन-रचना-कार्य-कमीं लाभते
देवांची जननी प्रसन्न जर का ही शक्ति कोणावर,
नाहीं यांत विशेष, तुच्छ जग हें त्यालागुनी वाटतें !

 

- धारवाड, २८ जुलै, १९०४
मासिक मनोरंजन, वर्ष १०, अंक ७,
जानेवारी १९०५, पृ. २९७
'यथामूल आवृत्ती' १९६७, पृ. १५५

केशवसुतांचा जीवनपट

फलक