फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

आईकरितां शोक

(जाति-परिलीना)

अन्तरले पाय तुझे हाय हाय माते ! ।।ध्रु.।।
मागें तव दर्शन मजलागुनी जहालें,
तदनन्तर लोटुनियां दिवस फार गेले;
फिरुनि तुझ्या चरणांतें
उत्सुक मी बघण्यातें
असतां, अन्तींहि न ते
दिसलें कीं- अहह! पूरयेत लोचनांतें !
अन्तरले पाय तुझे हाय हाय माते !                १

फिरुनि तुझें कोठें ते तीर्थरुप पाहूं !
पादरजीं लोळुनि तव धन्य केंवि होऊं !
जनकामागें जागृत
जननी गे तूं दैवत
उरलिस तीही साम्प्रत
गेलिस सोडुनि आम्हां दीन बालकांतें !
अन्तरले पाय तुझे हाय हाय माते !                २

कठिण जगीं या बघती छिद्र काक सारे,.
करुणेचें कोठेंही नसे लेश वारें !
तुझ्यासवें क्षमा दया
प्रीतिही गेली विलया!
मदपराध घालुनियां
पोटीं, नुरलें कोणी प्रेम करायातें !
अन्तरले पाय तुझे हाय हाय मातें                 ३

कष्ट दिले तुजला मी फार फार आई !
त्यांची मजकडुनि फेड जाहली न कांही !
दुर्भंग मी असा असें,
म्हणुनि दु:ख वाटतसें,
कंठ फार दाटतसे!
रडतों गुडघ्यांत म्हणुनि घालुनी शिरांते !
अन्तरले पाय तुझे हाय हाय माते !               ४

- 'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १४८-१४९

केशवसुतांचा जीवनपट

फलक