फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

वियुक्ताचा उद्भार

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)

राहे नित्य वसुंधरेस धरुनी हा भाग्यशाली गिरी;
वेलेला लहरीकरीं निरवधी हा अब्धि आलिंगतो,
रेषेला क्षितिजाचिया बिलगुनी आकाश तो नांदतो;
तैसा तो ध्रुव उत्तरेस न कधी सोडून जाई दुरी;
चित्रोल्लास चिर प्रकाश सुभगच्छायासखीशीं करी;
पोटाशीं धरुनी सदा सुरधुनी स्वलोंक हा राहतो;
घेऊनी द्युतिदेवतेस तरणी संगें तसा चालतो;
प्रेमें पुरूष संतत प्रकृतिला आश्लेषुनी तो धरी !
ही युग्में बघतां सुखी मम मनीं प्राणाप्रिये कालवे;
त्यांचा मत्सर उद्भवून हृदयीं होतें नकोसें जिणें !
तूतें सोडुनि दूर हाय! न मुळीं आतां मला राहवे;
कैसे तूं असशील गे दिवस हे कंठीत माझेविणें !
धिक्कारी मज मीच, ज्या तुजला कष्टांत या लोटवे,
ही युग्में बघतां सखें ! विरह हा दे दु:ख मातें दुणें !

- १५ डिसेंबर १९०१
मासिक मनोरंजन
वर्ष ९, अंक २, ऑगस्ट १९०३, पृ.३७
'यथामूल आवृत्ती' १९६७, पृ. १४५

केशवसुतांचा जीवनपट

फलक