फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

आम्ही कोण?

(वृत्त – शार्दूलविक्रीडित)

आम्ही कोण म्हणून काय पुससी? – आम्ही असूं लाडके
देवाचे, दिधलें असें जग तयें आम्हांस खेळावया;
विश्वीं या प्रतिभाबलें विचरतों चोहींकडे लीलया,
दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके !
सारेही बडिवार येथिल पहा ! आम्हांपुढें ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया
सौन्दर्यातिशया, अशी वसतसे जातू  करांमाजि या;
फोलें पाखडितां तुम्ही, निवडितों तें सत्त्व आम्ही निकें !
शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणीं सुरांच्या बरें?
पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ?
ते आम्हीच; सुधा कृतींमधुनियां ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभतें !
आम्हांला वगळा – गतप्रभ झणीं होतील तारांगणें;
आम्हांला वगळा – विकेल कवडीमोलावरी हें जिणें !

- फैजपूर, २९ नोव्हेंबर १९०१
मासिक मनोरंजन, वर्ष ७, अंक ११, मे १९०२, पृ. २४१
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १४१

केशवसुतांचा जीवनपट

फलक