फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

फुलपाखरु

बाळ्या :-
“ताई ! मला तें धरुन दे ग फुलपांखरुं !
गडे खेळायला,
बागडायला
हवें मला;
तर, धरुन मला दे लौकर तें फुलपांखरुं !
दे ग दे ग तें पांखरुं !”                                 १

ताई :-
“बाळ्या ! जाऊं दे तें नको अम्हां फुलपांखरुं !
उडूं दे रे
नाचूं दे रे
फुलावरि रे
इकडे तिकडे गरिब बिचारें पांखरुं !
पण नको अम्हां तें पांखरुं !”                         २

बाळ्या :-
“असें कां बरें म्हणतेस, ग माझे ताई ?
तें सुरेंख किती,
तें खुलें किती,
त्याची मजा किती,
तर, गोजिरवाणें धरुन दे ग कर घाई !
मला ‘नाही’ म्हणूं नको कांही !”                    ३

ताई :-
“ तें सुरेख आहे, म्हणून बाळ्या ! सांगतें, -
तें धरुं नये,
त्याला अडवूं नये,
त्याला दुखवूं नये;
हर सांगुं नको तें धरायाला, हेंच मागतें;
पहा ! फुलांवरी बागडते !”                          ४

बाळ्या :-
“ तें सुरेख आहे, म्हणुनच तर मागतों;
त्याला कांही,
माझे ताई !
दुखवित नाहीं;
मला खेळायला तें धरुन दे, हें सांगतो,
गडे ! तुझी विनवणी करितों !                     ५

ताई :-
“गडे ! असा नको तूं धरुं हट्ट रे बाळा!
तें लहान आहे,
फार नाजुक आहे,
कोमळ आहे;
त्याला खपणार नाहीं आपल्या खेळाचा चाळा !
त्याचा होइल चोळामोळा !                         ६

“माझा शाहणा ना तूं ! कडेवर तुला घेतें !
माझ्या बगड्या रे !
माझ्या छकुड्या रे !
मजा पाह्यला रे

त्या पांखरामागून वेलींमधुन तुला नेतें !
-मग झालें ना ?
सोन्या ! पहा कसें तें फुलांवरी बागडतें !
झणिं हवेमधींही तरतें !”

मुंबई, १७ ऑगस्ट १८९२
करमणूक, २० ऑगस्ट १८९२, पृ. ३४७
विद्यार्थीमित्र, वर्ष १, अंक ९ ते १२, पृ. १५४-१५५
मासिक मनोरंजन, वर्ष २, अंक ५ व ६

केशवसुतांचा जीवनपट

फलक