फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

निशाणाची प्रशंसा

(दोहा)

तुज जरि करिती काठीला
लावुनियां पटखंड
तरि तुजमध्यें वसत असे
सामर्थ्य बा उदंड !                  १

कोण नेतसे समराला
सांग बरे रणधीर
माराया कीं मरावया
कृतनिश्चय ते वीर ?               २

शूरशिरापरि धीटपणें
युद्धाच्या गर्दीत
कोण नाचतें फडकत रे
स्फुरण त्यांस आणीत ?          ३

तारुं पसरनि अवजारें
भेदित सिंधू जाय,
तच्छिखरीं तत्साहस तूं
मूर्त न दिसशी काय ?            ४

उंच उंच देवायतनें
भव्य राजवाडे
तुंग दुर्गही शिरीं तुला
धरिताती कोडें !                    ५

भक्ति जिथें दिव्यत्व जिथें.
जेथें उत्सव फार,
तेथें तेथें दिसे तुझा
प्रोत्साहक आकार !               ६

वीर्य जिथें, ऐश्वर्य जिथें
जेथें जयजयकार
उंचावर तेथें तेथें
दिसे तुझा आकार !               ७

म्हणून मानवचित्ताची
उंचावर जी धाव,
तीचे चिन्हच तूं तुजला
निशाण सार्थच नाव              ८

मिळमिळीत ज्याची कविता
न असे रंडागीत
खचित जडेलचि त्या कवीची
तुझ्यावरी रे प्रीत                ९

संसारा मी समर गणीं;
उचलुनि म्हणुनि निशाण,
साद घालितों – “यौद्धे हो
झटुनि भिडुनी द्या प्राण !”     १०

 

करमणूक, २१ जानेवारी १८९९, पृ. ९२
सुविचारसमागम, वर्ष २, अंक १२
एप्रिल १९००, पृ. ४
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १२९-१३०

केशवसुतांचा जीवनपट

फलक