फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

मनोहारिणी

(जाति-सृष्टिलता)

तीच मनोहारिणी ! जी ठसलीसे मन्मनी !       ध्रु.
सृष्टिलतेची कलिका फुलली
अनुपम, माधुर्यानें भरली;
जिच्या दर्शनी तटस्थ वृत्ति
भान सर्वही विसरुनि जाती;
ती युवती पद्मिनी-जी ठसलीसे मन्मनीं !        १

निज गौरत्वें शशिकान्तीला
लज्जा आणीलचि ती बाला,
तल्लावण्यप्रभा चमकते !
विजेहूनिही नेत्र दिपविते !
रुपाची ती खानी-जी ठसलीसे मन्मनीं !         २

“इच्या कुन्तलावरणाखालीं
तारका कुणी काय पहुडली?
उज्ज्वला ही तरीच विलसे
भाळीं ! हा उद्भार निघतसे,
ती तरणी पाहुनी-जी ठसलीसे मन्मनीं !        ३

“शीर्षी निजल्या त्या तारेचे
किरण आगळे या रमणीचे
नेत्रांवाटे काय फांकती !”
उद्भारविते प्रेक्षकास ती
निज दृष्टिप्रेषर्णी – जी ठसलीसे मन्मनीं !      ४

गुलाब गालीं अहा! विकसले
आणि तेथ जे खुलुनि राहिले,
विलक्षणचि ते – कंटक त्यांचे
सलती हृदयीं कामिजनांचे !
ऐशी ती कामिनी-जी ठसलीसे मन्मनीं !        ५

मृदु हसतां ती मधुर बोलतां
प्रगट होय जी हृदयंगमता,
तीच्या ग्रहणा नयनें श्रवणें
सुरांचींहि वळतिल लुब्धपणें
ऐशी ती भामिनी-जी ठसलीसे मन्मनीं!          ६

वक्ष:स्थल पीनत्व पावलें,
गुरुत्वहि नितंबी तें आलें;
तेणें सिंहकटित्व तियेचें
अधिकाचि चित्ताकर्षक साचें !
विकल करी मोहिनी-जी ठसलीसे मन्मनीं !    ७

बहराला नवयौवन आलें,
ओथंबुनि तें देहीं गेलें !
म्हणुनि पळाली बाल्यचपलता,
गतिनें धऱिली रुचिर मंदता
गजगमनें शोभिनी-जी ठसलीसें मन्मनीं !      ८

सौंदर्य शालीन्यें पुतळी
ती रामायणमूर्तचि गमली,
उदात्त मुद्रा, गभीर चर्या,
यांही भारतखचिता वर्या,
ती रमणी सद्गगुणी-जी ठसलीये मन्मनीं !       ९

तिच्या दर्शनें मन उल्हासे
तिजविण सगळें शून्यचि भासे,
म्हणुनी करुनी ध्यानधारणा
अन्तर्यामीं बघतों ललना
तीच मनोहारिणी-जी ठसलीसे मन्मनीं !        १०

- मासिक मनोरंजन, वर्ष ३, अंक ९
मार्च १८९८, पृ. १५८-१५९
काव्यरत्नावली, वर्ष १६, अंक ४
एप्रिल १९०४, पृ. ६१-६६

केशवसुतांचा जीवनपट

फलक