फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

दंवाचे थेंब

(जाति-बालानंद)

“कोठुनि हे आले येथें?
काल संध्याकाळी नव्हते !”
हिमकण ते पाहुनि वेलीं
वरि पडले आज सकाळीं,

आईला बाळ्या वदला
कुतुकानें उत्सुकलेला-
“दिसती हे गोजिरवाणे
मोत्यांचे जैसे दाणे !
आई गे ! तर वद मातें
कोठुनि हे आले येथे?
सूर्याच्या ह्या किरणांत
कसे पहा चकमकतात !
मौज मला भारी वाटे !
होते ते तर वद कोठें?”

चुम्बुनियां त्या तनयातें
वर करुनी बोट वदे ते –
“चन्द्र आणि नक्षत्रें तीं
शोभली जेथ वा रातीं,
उजेडही जेथुनि येतो,
पाउसही जेथुनि पडतो,
तेथुनि हे आले येथें;
तेथुनीच तूंहि आम्हांते !”
“राहतील येथें का ते ?
मिळतिल का खेळायातें ?
मज गम्मत वाटे, आई,
घेउनि दे मजला कांही !”
“नाहीं रे ! ते स्वकरांत
येणार गड्या नाहींत;

कौतुक कर बघुनी त्यांतें
असती ते जोंवरि येथें;
सूर्य त्यांस अपुल्या किरणीं
नेईलचि लौकर गगनीं !”

“जातिल ते लौकर गगनीं”
वदतां गहिंवरली जननी !
गत बाळें तिजला स्मरलीं,
डोळ्यांत आंसवें आलीं !

“देवारे!”- मग ती स्फुंदे-
“एवढा तरी लाबूं दे !”
म्हणुनि तिनें त्या बाळासी
धरिलें दृढ निज हृदयाशीं !

पाहुनि त्या देखाव्याला
कळवळा कवीला आला;
वेडावुनि तयाच नादें
“खरेंच!” – तो पुसतो खेदें –
“होते हिमबिन्दु सकाळी,
कोठें ते सायंकाळी ?”

- बालबोधमेवा, वर्ष २६, अंक २, फेब्रुवारी १८९८, पृ. ९८
सुविचारसमागम, वर्ष २, अंक ७, नोव्हेंबर १८९९, पृ. १-२

केशवसुतांचा जीवनपट

फलक