फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

फार दिवसांची भेट

(चाल – “इस तन धनकी कोन बढाई.”)

बहुतां दिवशीं भेट जाहली
प्रणयसिंधुला भरती आली !            ।।ध्रु.।।

आलिंगन दृढ देतां आला
उभयीं हृदयीं त्वरित उमाळा;
नावरुन तो रमणीनयनीं
बाष्पें आलीं ऊन होउनीं;
गलित शीर्ष निज पतिच्या हृदयीं
ठेवुनि रडली ती त्या समयीं;
तोहि उसासे टाकित तिजला
चुम्बित, गाळूं टिपें लागला;
उभयाश्रुजलें मिसळुनि गेली!
बहुतां दिवशी भेट जाहली            १


वियोगसमयीं झाले त्यांचें
म्लान रुप तें परस्परांचे
ध्यानी येतां, प्रेमग्रंथि
त्यांची झाली अधिकचि दृढ ती;
कालें आणिक कष्ट दशेनें
क्षीणत्वाला होतें जाणें
सगळ्यांचेही, परी प्रीतिचा
जेम वाढतो उलटा साचा !-
कुरवाळित अन्योन्यां ठेलीं !
बहुतां दिवशीं भेट जाहली !         २


किती वेळपर्यंत तयांना
कांहीं केल्याही वदवेना;
‘प्रिये लाडके !’ जिवलग नाथा !
हे रव वदली मग उत्सुकता;
फुटकळ वाक्यें मग दोघांहीं
परस्परां जीं म्हटलीं कांहीं,
भाव त्यांतला कीं, - नच व्हावा
वियोग फिरुनी, किंवा यावा
मृत्युच फिरुनी, किंवा यावा
मृत्युच दोघां त्याच सुवेळीं !
जधीं बहुदिनी भेट जाहली !        ३

२६ जानेवारी १८९८
काव्यरत्नावली, वर्ष ११ अंक ३
सप्टेंबर १८९८ पृ. ५९-६०

केशवसुतांचा जीवनपट

फलक