फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

समृद्धि आणि प्रीति

(वृत्त – शार्दूलविक्रीडित)

एक दुसर्‍यास म्हणतो :-

आहे द्वीप सुरेख एक सखया त्या दक्षिणेच्या दिशे,
लंकेचें अजुनी भलें शकल तें राहूनि तेथें असे;
शोभे तें दिवसा सरित्पतिवरी, तेव्हां गमें इंदिरा
वैकुण्ठाहुनि पातली अपुलिया ताताचिया हा घरा !           १

तेथें कांचनमंन्दिरे तळपती सम्पत्तिनें कोंदली,
उद्यानें जणुं काय नन्दनवनें स्वर्गाहुनी आणिलीं,
सारे भोग सदैव सिद्ध असती संगीतवाद्यादि तें;
तेथें जाइल आयु साच मजला स्वप्नापरी वाटतें !            २

येतें कां तुझिया मनांत वसुनी भोगां तिथें भोगणें ?
आधीं हें चुकलो परन्तु तुजला सांगावया सांगणें –
कीं येथें न शके कुणी पुरुष तो स्त्री आणण्याला कदा,
सीताशाप असे अलंघ्य असला द्वीपावरी त्या सदा !          ३


दुसरा पहिल्यास :-

सीताशाप जरी मुळींच नसता त्या द्वीपखण्डावरी,
न्यायाला मजला जरी गवसती तेथें सखी अंतुरी,
येतों मी न तरीहि तेथिल सुखें ती भोगण्या आयतीं,
जीं प्रीतीस मला गमे ढकलिती शाब्दाशेषाप्रती.              ४

सीताशाप परन्तु त्यावरी असे दुर्लंघ्य आतां तर;
तेव्हां पौरुषपूर्ण कोण असला राहील तेथें नर ?
आम्हांला रुचती न तीं श्रमफलें कान्ते दिल्यावांचुनी,
तेथें सेविल कोण अश्रमफलें ती एकला राहुनी ?             ५

तूं माझ्याकरितां तरी हुडकुनी ते द्वीप रे काढणें,
जेथें रान भयाण फार असती कांटे कडे वांकणें,
जेथें वन्य पशू सदा डिरकती हिंसा जयांना प्रिया;
तेथें घेउनियां प्रिया मग मला आज्ञा करीं जावया !          ६

कांटे झाडिन मी, पशू वधिन मी, किल्ला तिला बांधिन,
ती तीतें सुख व्हावयास अपुले हे प्राणही टाकिन;
बांधूं आम्हि परस्परांप्रत लताजालीं सुखाने गळीं;
स्वर्गाला निरयामधूनि पहिल्या कांढू अम्ही त्या स्थळीं    ७

मासिक मनोरंजन, वर्ष २, अंक २,
ऑगस्ट १८९६, पृ. ३९
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ४२

केशवसुतांचा जीवनपट

फलक